अनेक जणांचे संसार तुटण्यापासून वाचवण्यात महाराष्ट्र पोलीस दलाची महत्त्वाची भूमिका आहे. अशाच अशीच एक घटना पुणे येथे उघडकीस आली असून पतीशी भांडण करून रुसून औरंगाबादवरून या महिलेने पुणे गाठले होते मात्र त्यानंतर दामिनी पथकाकडून महिलेचे समुपदेशन करण्यात आले आणि ती पुन्हा तिच्या पतीकडे सुखरूप परतली.
उपलब्ध माहितीनुसार, औरंगाबाद येथील एक हॉटेलचालक असलेले दिलीप नावाच्या व्यक्तीच्या पत्नी मीरा ( वय 30 ) यांचा घरी किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यातून त्यांनी घर सोडले. पती यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडत नव्हती.तीन तारखेला मीरा यांनी ससून रुग्णालयासमोरील एका दुकानातून चप्पल विकत घेतली मात्र देण्यासाठी पैसे नसल्याने तिने पती दिलीप यांना व्हाट्सअप करून 280 रुपये दुकानदाराला पाठवा, असा मेसेज केला.
दिलीप यांनी तातडीने त्या दुकानदाराला संपर्क करून, ‘ तुम्ही जिला चप्पल विकली आहे ती माझी बायको आहे आणि ती घरातून रूसून गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही तिला तिथेच ठेवा, ‘ असा निरोप दिला आणि दिलीप यांनी 112 वर संपर्क करून ही माहिती पोलिसांना दिली. बंडगार्डन दामिनी मार्शल सारिका सोनवणे आणि सोनाली बिराजदार या लगेच तिथे आल्या आणि त्यांनी मीरा हिला गोड बोलून बंडगार्डन पोलिस ठाण्यात आणले.
अवघ्या काही तासांमध्ये महिलेचे पती देखील तिथे पोहोचले. दोघांचीही समजूत घालून त्यांना पुन्हा औरंगाबादला रवाना करण्यात आले. दामिनी पथकाच्या या कामाची परिसरात चांगलीच चर्चा असून एक संसार तुटण्यापासून वाचवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.