नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून शेवगाव येथील दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याची घटना पंधरा तारखेला समोर आलेली आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार एका युवकाच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींची या आरोपीच्या ताब्यातून सुटका करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कार्तिक राजेंद्र काळे ( वय 20 आयशा नगर शेवगाव ) असे आरोपीचे नाव असून मुलीचे आई-वडील कामावर गेलेले असताना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पीडित परिवारातील 13 आणि दहा वर्षांच्या मुली बागेत खेळण्यासाठी गेलेले असताना आरोपीने त्यांचे अपहरण केले. कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला असता रात्री आठ वाजले तरी मुली घरी आल्या नाही.
चिंतातुर झालेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि शोध सुरु केलेला असताना दोन्ही मुली कार्तिक याच्या ताब्यात असल्याचे आढळून आले. मुलींनी तक्रार दिली की, कार्तिक काळे याने सव्वा सात वाजण्याच्या सुमारास नागेबाबा पतसंस्थेच्या जवळ कारमध्ये आम्हाला पळवून नेले होते त्यानंतर लांडे वस्ती येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मजल्यावर ठेवले, असे देखील म्हटले आहे. कार्तिक काळे याने मुलींचे अपहरण का केले ? याचा तपास सुरू असल्याचे समजते.