अचानकपणे तुमच्या खात्यात जर कधी पैसे आले तर आनंद होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे मात्र अनेकदा याचा वापर करत चुकीच्या देखील गोष्टी केल्या जाऊ शकतात हे या घटनेनंतर समोर आले आहे. अशीच एक घटना मुंबईतील घाटकोपर येथे घडलेली असून बँक खात्यात अचानक 60 हजार रुपये आल्याने महिला हुरळून गेली आणि तिने त्यातील काही पैसे खर्च देखील केले मात्र दुसऱ्या दिवशी कुर्ला पोलिस तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी तिला तिच्या खात्यात आलेला पैसा हा चोरीचा असल्याचे समजले. एका चोराने वचपा काढण्यासाठी चोरीच्या मोबाईलवरून तिला गुगल पे केले होते मात्र पोलिसांनी तपास करत खरा प्रकार उघड करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, साहिल सईद कुरेशी ( वय 22 ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो घाटकोपर येथील नित्यानंदनगरमध्ये राहतो. त्याच्या मित्राच्या घरी 1 महिन्यापूर्वी चोरी झाली होती त्यावेळी आत्ताच्या पीडित महिलेने तीन जणांवर आरोप केले होते त्यात साहिल याचा समावेश होता मात्र पोलीस कारवाई दरम्यान झालेल्या त्रासाचा वचपा काढायचा या हेतूने आरोपीने हे कृत्य केले.
घाटकोपर रेल्वे स्थानकावर फिरत असताना त्याने एका व्यक्तीचा मोबाइल चोरला त्यावेळी त्या व्यक्तीने कुरेशी याला हा फोन परत करण्याची मागणी केली त्यावेळी हा फोन तुझाच आहे याच्यावर विश्वास कसा ठेवू ? असे म्हणत तू फोनची पिन सांग, अशी मागणी कुरेशी याने केली त्यानंतर समोरील व्यक्तीने कुरेशी याला फोनची पिन सांगितली त्यानंतर कुरेशी याने त्याच्या मोबाईलमधून 64 हजार दोनशे रुपये महिलेच्या अकाउंटवर पाठवले. महिलेच्या अकाउंटवर पैसे आल्यानंतर ती खुश झाली आणि हुरळून गेली आणि तिने देखील काही पैसे खर्च केले.
मात्र त्यानंतर पोलीस घरी आल्यावर महिलेने असा प्रकार करण्यामागे कदाचित साहिल कुरेशी याचा हात असावा, अशी माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावित सहाय्यक पोलीस फौजदार डीपी सय्यद आणि पथकाने ही कारवाई केली आहे.