देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली मात्र अद्यापही लोकांच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा काही कमी झालेला नाही. भोंदू बाबाच्या आहारी जात चक्क नागरिक आपला विवेक गहाण ठेवून काहीही कृत्य करण्यास तयार होतात असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आलेला असून भोंदूबाबाने एका अधिकाऱ्याला चक्क दहा लाख रुपयांना गंडा घातलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ‘ तुम्हाला कुणाचा तरी शाप लागलाय म्हणून तुमच्या धमन्यांमधील रक्त गोठलेले आहे ‘ त्याची भिती घालून रेल्वेतील वरिष्ठ अभियंत्यांच्या पाठीवर उपचाराच्या नावाखाली सर्जिकल ब्लेडने वार केले आणि इतके करूनही फरक पडला नाही म्हणून सदर अधिकाऱ्यांनी वजीराबाद येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
रेल्वेत कार्यरत असलेले वरिष्ठ अभियंता मुरारीलाल जयराम मीना यांना 2019 पासून पाठीला पार्किन्सन प्रकारातील आजार होता. अनेक ठिकाणी उपचार करून देखील काही फरक पडत नसल्याने ते हतबल झाले होते अशातच रेल्वे कोर्ट परिसरात फिरत असलेला एक भोंदू बाबा यांच्या निदर्शनास पडला आणि त्यांच्यात संभाषण सुरू झाले.
सदर भोंदूबाबा आपण स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत होता. चांगल्या उपचाराच्या प्रतीक्षेत असलेले मुरारीलाल यांनी आपले दुखणे त्याला सांगितल्यानंतर ‘ तुम्हाला कोणाचा तरी शाप लागला आहे आहे त्यामुळे तुमच्या धमन्यांतील रक्त गोठले आहे आणि शरीरात ब्लॉकेज तयार झालेले आहेत ‘, असे सांगत मीना यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि उपचार करण्याच्या नावाखाली तब्बल दहा लाख रुपयांना गंडा घातला. पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत असून वृत्त लिहीपर्यंत या बाबाला अटक करण्यात आली नव्हती.