महाराष्ट्रात ग्रामीण पातळीवर शेतकरी युवकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकतर शेतीच्या उत्पादनांना मिळणारा अशाश्वत भाव आणि त्यामुळे होणारी आर्थिक चणचण तसेच शेती करत असल्याने मुलीच्यांकडुन लग्नास येणारे नकार यामुळे शेतकरी युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य निर्माण झालेले आहे. काही दिवसांपूर्वी लग्न जमत नसल्याने एका युवकाने नैराश्यातुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली होती.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे अशाच स्वरुपाची एक घटना समोर आलेली असून एका शेतकरी युवकाने ‘ सरकार शेतकऱ्यांचा कधीच विचार करणार नाही पुन्हा कधी शेतकऱ्यांच्या जन्माला येणार नाही असे म्हणत विषारी द्रव्य प्राशन करून त्याचा व्हिडिओ बनवला आणि आत्महत्या केली ‘ सुरज जाधव ( राहणार मगरवाडी तालुका पंढरपूर ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असल्याचे समजते.
सूरज जाधव याचा आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात सुरज याने हातात विषाची बाटली धरून ‘ आता शेतकरी म्हणून कधीच जन्माला येणार नाही. आपलं आयुष्य इथपर्यंतच आहे यापुढे नाही ‘, असे म्हणत त्याने विषारी द्रव्याची बाटली तोंडाने घेत उघडली आणि ते प्राशन केले. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आणि काही जणांनी तात्काळ धाव घेत त्याला पंढरपूर येथे उपचारासाठी हलवले मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर प्रकरणाची पोलिस चौकशी करत असल्याचे समजते मात्र यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांच्या अडचणी काय थराला गेलेल्या आहेत याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रात्री अपरात्री येणारी वीज, बिबट्या आणि वन्य प्राण्यांची भीती , शेतीस उपलब्ध न होणारे मनुष्यबळ यासाठी अनंत अडचणींचा सामना करून अखेर शेतीमालाला न येणारा भाव यातून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत असल्याने ग्रामीण पातळीवरील युवक हा नैराश्यात गेल्याचे चित्र देशपातळीवर दिसून येत आहे.