देशात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून राजस्थानच्या आदिवासी बहुल बांसवाडा जिल्ह्यात चक्क मुलाला वाचवण्यासाठी सुनेचा सौदा केल्याची घटना उघडकीस आली आहे .कर्जात अडकलेल्या सासरच्या मंडळींनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सुनेला 7 लाखांना विकले असे सुनेचे म्हणणे असून त्यांनी चक्क तिला विकून आलेल्या पैशातून तिच्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला.
उपलब्ध माहितीनुसार, बांसवाडातील खमेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलही घटना असून पत्नीचे नाव रेणुका असे असून पतीचे नाव गोपाळ असल्याचे समजते . रेणुका सध्या आपल्या माहेरी राहत आहे. पोलिसांनी मदत केली नाही म्हणून अखेर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाच्या आदेशानंतर सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, तब्बल 7 वर्षांपूर्वी तिचं गोपाळसोबत लग्न झालं होतं. लग्नात वडिलांनी मोठ्या प्रमाणात हुंडा दिला होता. त्यांना एक मुलगीही आहे ती सध्या 4 वर्षांची आहे.एके दिवशी तिचा पती आंब्याच्या झाडावरुन खाली पडला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान तब्बल 3 महिने तो कोमात होता.
घरच्यांनी गोपाळच्या उपचारासाठी दागिने विकले. जमीनदेखील कर्जाऊ दिली मात्र पुढे उपचारासाठी पैसे लागत असल्याने सासरच्या मंडळींनी तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. 7 लाखात त्यांनी रेणुकाचा करार केला मात्र तिने याला नकार दिला आणि त्यातून तिला सासरच्या मंडळींनी मारहाण देखील केली. हतबल झालेल्या रेणुका हिने यानंतर पोलिसांकडून मदत मिळत नसल्याने कोर्टात फिर्याद दाखल केली.