पाच राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाल्यानंतर राज्यात देखील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ भाजप काहीही करून महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा बंगल्यावर अर्धा तास चर्चा केली आहे.
प्रत्येक राज्यात काँग्रेसला दुर्बल करण्याची भाजपची रणनीती दिसून येत असून काँग्रेसला मानणारा वर्ग हा पद्धतशीरपणे इतर लहान पक्षांकडे कसा जाईल ही भाजपची खेळी असून महाराष्ट्रातही उद्या तसेच झाले तर महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो या मुद्द्यावर ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. आताच्या निकालानंतर विशेषतः शिवसेनेमध्ये अधिक खळबळ असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये देखील चलबिचल सुरू आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्यावेळी राज्यातील सद्यस्थितीबाबत त्यांच्या देखील चर्चा झालेली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्तेवरून खेचण्यासाठी केंद्रीय स्तरावर देखील प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे .