देशात फसवणुकीचे अनेक प्रकार रोज समोर येत असून अशीच एक घटना मुंबई येथे समोर आलेली आहे विशेष म्हणजे आयटी क्षेत्राशी संबंधित असलेल्या या व्यक्तीला एकाने लाखो रुपयांना गंडा घातला आहे. आपण लंडन येथे राहत असून आपल्याशी मैत्री करायची इच्छा आहे , असे सांगत महिला प्रोफाइल असलेल्या या व्यक्तीने संबंधित आयटी अधिकाऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि त्यानंतर त्यांना चार लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. काळाचौकी पोलिसांनी सदर प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, संबंधित अधिकारी हे एका नामांकित बँकेत कार्यरत आहेत त्यावेळी त्यांना फेसबुकवर स्टीफन नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि आपण डॉक्टर असून लवकरच भारतात येत आहोत असे देखील सांगितले. त्यांच्यामध्ये व्हाट्सअँप क्रमांक शेअर झाले. मैत्री देखील झाली.
चार मार्च रोजी स्टीफन हिने आपण दिल्ली विमानतळावर आलेलो असून कस्टम अधिकाऱ्यांनी आपल्याला पकडले आहे , असे सांगत वेगवेगळी कारणे पुढे करण्यास सुरुवात केली. 7 मार्चपर्यंत फिर्यादी यांच्याकडून 4 लाख 30 हजार रुपये देखील उकळले मात्र तरी देखील सातत्याने पैशांची मागणी होत असल्याने फिर्यादी यांना संशय आला आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तपास सुरु आहे.