अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बऱ्याचदा उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून अंधश्रद्धा निर्मूलनची कारवाई ही फक्त विशिष्ट धर्मीय व्यक्तींवर होते अशी टीका होत असते मात्र यात कोणतेच तथ्य आढळून येत नाही. लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे अशीच एक घटना उघडकीला आली असून भूत उतरवणे आणि भानामतीची अंधश्रद्धा पसरवत अनेकांना गंडवणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील रेणापूर नजीक खलंग्री येथील असलेला बाबा हक्कानी इस्माईल शेख हा आपल्या घरी दर गुरुवारी आणि अमावस्या पौर्णिमेला दरबार भरवत होता. मुल होत नसेल तर, धंद्यात बरकत, घरातील वाद, कॅन्सर, रक्तदान, मधुमेह, मणक्याचे आजार अशा अनेक प्रकारांनी त्याने नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. सदर प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार आल्यानंतर समितीने जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना या प्रकाराची माहिती दिली आणि या बाबाला ताब्यात घेण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी म्हटले आहे की, ‘ कोंबड्या उतरवणे, भक्तांच्या ऐपतीप्रमाणे कंदुरी, दान पेटीत दान, बाबाच्या फोटो पुढे किमान 50 100 500 च्या नोटा टाकायला सांग, उपचार म्हणून लिंबू पिळून नाका-डोळ्यात टाकणे, उपचाराला आलेल्यांच्या अंगाला स्पर्श करून लिंबू चोळणे, कोंबडीची मान मोडून भक्तांच्या अंगावरून उतरवणे असे अघोरी प्रकार तो करत होता. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे बहुमूल्य सहकार सहकार्य मिळाले असून सामान्य लोकांची फसवणूक यामुळे थांबलेली आहे. ‘