अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपल्या रिलेशनची माहिती घरी सांगेल, अशी भिती दाखवून तिच्या प्रेमीने ब्लॅकमेल करुन पैसे लुबाडले. दुसऱ्या एका मुलाने तुझे रिलेशन तुझ्या घरी सांगण्याची धमकी देऊन त्याने देखील या मुलीला लुबाडल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे.
सदर प्रकरणी , सिंहगड रोड पोलिसांनी ऋतीक अशोक दिघे (वय १९, रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक केली आहे तर सार्थक नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आनंदनगर येथे राहणार्या एका १७ वर्षाच्या मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील एका १७ वर्षाच्या मुलीसोबत ऋतीक दिघे याने जवळीक साधून मैत्री केली. त्यानंतर तिला भावनिक ब्लॅकमेल केले. दोघांचे रिलेशन घरी सांगेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे तो वेळोवेळी पैसे मागू लागला. तिच्याकडून त्याने आतापर्यंत ७ हजार ५०० रुपये लुबाडले.
डिसेंबर २०२१ मध्ये तिला खडकवासला येथे घेऊन गेला. तेथे तिच्या गालावर, हातावर किस करुन तिचा विनयभंग केला. या दोघांच्या रिलेशनची माहिती सार्थक याला मिळाली. तेव्हा त्याने या मुलीला ऋतीक व तुझे संबंधाबाबत तुझ्या आईवडिलांना सांगेल, अशी धमकी दिली. तिच्याकडे पैशाची मागणी करुन ५०० रुपये घेतले. आपल्या मुलीला वारंवार अधिक पैशाची गरज का भासते ? याची चौकशी केल्यावर या मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.