राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला तसेच हिंदू मुस्लिम समाजामध्ये देखील तणाव भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपावरून राणे बंधूंच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष श्रीनिवास उर्फ सुरज व्यंकटराव चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार नितेश व खासदार निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
तक्रारीत म्हटले आहे की, 9 मार्च रोजी आझाद मैदान येथे मोर्चाला संबोधित करताना नितेश यांनी अनिल देशमुख मराठा समाजातून येतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मात्र नवाब मलिक मुस्लीम समाजातून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही असे विधान केले होते. शरद पवारांनी राजीनामा द्यायला हवा होता मात्र ते दाऊदचा माणूस असल्याने त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही, असे देखील म्हटले होते तर निलेश राणे यांनी देखील शरद पवारांचा थेट दाऊद यांच्याशी संबंध असल्याचे देखील म्हटले होते.
राजकीय वर्तुळात यांच्या या आरोपानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. राणे बंधूंकडून जाणीवपूर्वक दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे भाष्य केले गेले तसेच शरद पवार यांचेही नाव दाऊद इब्राहिम याच्यासोबत जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.