जे पक्षी मुक्त केल्यानंतर बाहेरच्या वातावरणात जगू शकतात अशा पक्षांना पिंजऱ्यात कैद करणे हा गुन्हा असून यामध्ये पोपटाचा देखील समावेश होतो मात्र अनेक नागरिक देखील घरात पाळण्यासाठी पक्षी म्हटल्यानंतर पोपटाचा विचार करतात त्यामुळेच पोपटांची तस्करी केली जात असून अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आलेली आहे. वाशिम येथून ठाणे येथे आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मोहम्मद रिजवान नाझरे ( वय 25 राहणार कारंजा जिल्हा वाशिम ) असे आरोपीचे नाव आहे. ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून त्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८० पोपटाची पिल्ले ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
अमरावती येथून निघून तो ठाणे रेल्वेस्थानकात उतरला होता. लोखंडी पिंजऱ्यावर कापड गुंडाळून पोपटांच्या विक्रीसाठी तो आलेला असताना त्याचा हा प्रकार एका नागरिकाने ठाणे वनपरिक्षेत्र येथे कळवला आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ठाणे रेल्वे स्थानकासमोरील एसटी डेपो जवळून जात असताना त्याला बेड्या ठोकल्या.
दोन मोठ्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये त्याने हे पोपट ठेवले होते आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने त्यावर चादर ठेवली होती. सदर पोपट त्याने वाशीम येथील जंगलातून आणल्याचा संशय वनविभागाला असून हे पोपट तो कोणाला देणार होता याचा तपास सुरू आहे.
पोपट वाचवणे का आहे गरजेचे ?
पोपट हा पक्षी वर्षातून एकदाच सुमारे तीन ते चार अंडी घालतो त्यातून दोन ते तीन पिल्ले जन्माला येतात आणि आणि काही महिन्यात ही पिल्ले स्वयंपूर्ण होतात इतर पक्षांच्या तुलनेत पोपट हा जोडीदाराच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ असल्याने बारा ते पंधरा वर्षाच्या पूर्ण आयुष्यात तो मोठ्या प्रमाणात पिल्ले जन्माला घालत नाही. मुळातच खूप कमी प्रमाणात पिल्ले जन्माला येण्याचे प्रमाण असल्याने ही पिल्ले देखील जर पिंजऱ्यात कैद करून ठेवली तर त्यापासून इतरही पिले जन्माला येत नाहीत आणि पर्यायाने पोपट हा वंश संपला जाऊ शकतो आणि जग एका देखण्या पक्षाला मुकले जाऊ शकते म्हणून कायद्याने पोपट पाळणे पिंजऱ्यात ठेवणे किंवा त्याची पिल्ले विकणे हा गुन्हा आहे. नागरिकांनीच आता सतर्क होऊन या देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्याची गरज आहे.