महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीला आली होती. सदर प्रकरणी पोलीस तपास करत असताना आरोपी इतका जवळचा निघेल याचा पोलिसांना देखील अंदाज नव्हता मात्र अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी नजीक जिरेगाव येथे एका वृद्ध शेतकऱ्याचा आणि त्याच्या बहिणीचा खून झाला होता.
उपलब्ध माहितीनुसार, सटवा ज्ञानबा मुंडे ( वय 74 ) शुभ्राबाई ज्ञानबा मुंडे ( वय ७० दोघेही राहणार जिरेवाडी तालुका परळी ) या शेतकरी बहीण-भावांचे 25 फेब्रुवारी रोजी शेतात मृतदेह आढळून आले होते. अत्यंत अमानुषपणे दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. शुभ्रा बाई यांचे पती भाऊसाहेब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलीस यंत्रणा सदर प्रकरणी तपास काम करत असताना हा प्रकार सटवा मुंडे यांच्या मुलानेच केल्याचे अखेर निष्पन्न झाले. तुकाराम सटवा मुंडे याने वडील आणि आत्याचा काटा काढण्याचे समजल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले. तुकाराम मुंडे हा कर्जबाजारी झाला होता आणि वडील आणि आत्याकडे पैशासाठी तगादा लावत होता मात्र त्याला पैसे देण्यास दोघांनीही नकार दिला म्हणून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे .अटक केल्यानंतर कोर्टाने त्याला 17 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत