महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुण्यातील पिंपरी येथे उघडकीला आली असून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या विवाहितेला पतीने चक्क तीन वेळा तलाक दिलेला आहे. पीडित विवाहितेने या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरुद्ध मुस्लिम महिला संरक्षण कायदा 2019 कलम 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला असून 17 जुलै 2021 ते १२ मार्च २०२२ या कालावधीत ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रुक्सार फैजान जमादार ( वय 28 राहणार माळुंगे पुणे ) यांनी शनिवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी महिला या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. फिर्यादी आणि फैजान जमादार यांचे 24 डिसेंबर 2017 रोजी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर पती, सासू, नणंद,काका हे पीडितेचा मानसिक तसेच शारीरिक छळ करत होते. विवाहितेने 13 जानेवारी 2022 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तशी फिर्याद देखील दिलेली होती.
17 जुलै 2021 रोजी विवाहिता तिच्या तीन वर्षीय मुलासह सासरी गेलेल्या असताना त्यांनी तिला घरात घेतले नाही आणि तिचा पती फैजान याने तीन वेळा तलाक म्हणून अंग काढून घेतले. ‘ आता तुझा माझा तलाक झालेला आहे त्यामुळे विषय संपला ‘, असे तो म्हणाला मात्र आपल्याला हा तलाक मान्य नाही, असे देखील फिर्यादीने त्याला ठणकावले.
‘ तुला कायदेशीर नोटीस पाठवतो ‘ असे देखील म्हणाला त्यानंतर त्याने फिर्यादी विवाहितेला तीन वेळा नोटीस पाठवली त्यात देखील त्याने दुसऱ्या लग्नाचा उल्लेख केला मात्र आपल्याला हे मान्य नसून मला नांदायचे आहे, असे म्हणत फिर्यादी विवाहितेने नोटीसला देखील उत्तर दिलेले आहे.. सदर प्रकरणी पोलीस तपास सुरु असल्याचे समजते.