पुणे येथील शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली 24 वर्षीय तरुणी ही अखेर गोवा येथे सापडली असून गोवा पोलीस तिची चौकशी करत आहेत .सदर प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मुलीची दुसरी पूजा चव्हाण होऊ नये, अशी मागणी केली होती.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले आहे की, ‘ गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाली होती त्यानंतर ती गोवा येथे असल्याची माहिती मिळाली असून गोवा पोलिसांना या संदर्भात कळविण्यात आलेले आहे. ‘
पुण्यातून एक पथक तिला गोवा इथे आणायला गेले असून तिला इथे आणून चौकशी केल्यानंतरच ती गोवा इथे का आणि कशी गेली ? हे समजू शकणार आहे. कुचिक यांच्याविरुद्ध सदर तरुणीने बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तिने एकदा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला आणि त्यानंतर ती गायब झाली होती. सदर तरुणी आता आढळून आल्यामुळे या प्रकरणात बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.