महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केल्याचा आरोप असलेले सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना शनिवारी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ओळखले असून आत्तापर्यंत ही या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी आहे. अंदुरे आणि कळसकर यांनी डॉक्टर दाभोळकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते दोघे तेथून फरार झाले अशी साक्ष त्यांनी दिली आहे.
विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या न्यायालयात पुणे येथे या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सदर प्रकरणी सनातन संस्थेशी संबंधित असलेले डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर एडवोकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणी साक्षीदारांची साक्ष सुरू असून या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्यांची शनिवारी साक्ष झाली. त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना ओळखले असून त्यांनी दिलेली साक्ष ही न्यायालयात आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड समजली जात आहे.
डॉक्टर दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी साक्षीदार हे पुलावर साफसफाई करत असताना त्यांची एक महिला सहकारी त्यावेळी तिथे होती. काम झाल्यावर ते पुलाच्या दुभाजकावर बसलेले असताना पुलावरील झाडावर एक माकड आले आणि कावळ्यांचा आवाज झाल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले तेव्हा दोन जणांनी एका व्यक्तीला गोळ्या झाडल्या आणि त्यामुळे ती व्यक्ती खाली पडली.
गोळ्या झाडल्यानंतर दोन तरुण पोलीस चौकीच्या बाजूला पळाले आणि त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. साक्षीदार डॉक्टर दाभोळकरांच्या जवळ गेले तेव्हा दाभोळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर साक्षीदार चित्तरंजन वाटिका साफसफाईसाठी निघून गेले अशी माहिती या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील एडवोकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली आहे. सदर ठिकाणी घडलेला पूर्ण घटनाक्रम साक्षीदारांनी न्यायालयात सांगितलेला असून सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर या दोघांनी डॉक्टर दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे देखील साक्षीदारांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे . खटल्याची पुढील सुनावणी आता 23 मार्च रोजी होणार आहे.