संसार म्हटलं की एकमेकांवर विश्वास हवाच मात्र अनेकदा कधीकधी गैरसमजुतीमधून संशयाचे भूत मनात शिरले की ते लवकर निघत नाही त्यातूनच अनेक वेगवेगळ्या घटना देखील पुढे घडत जातात. अशीच एक घटना नवी मुंबई परिसरात घडलेली असून पत्नीसोबत बोलण्याच्या रागातून एका व्यक्तीने शेजाऱ्याला मारहाण केली आहे. घनसोली गावात ही घटना घडलेली असून मारहाण झालेल्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी स्टूल मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून आरोपीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनसोली येथे राहणाऱ्या लक्ष्मण कांबळे यांच्यासोबत हा प्रकार घडलेला असून शुक्रवारी ते त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीबद्दल त्याच्या पत्नीकडे चौकशी केली आणि त्यानंतर ते इतर काही मित्रांसोबत घरी जेवण करत बसलेले असतानाच शेजारी राहणारा ईश्वर हा त्या ठिकाणी आला आणि त्याने शिवीगाळ करत त्यांना मारहाण करायला सुरू केली.
‘ माझ्या पत्नीसोबत का बोलतोस ? ‘ असे म्हणत ईश्वर याने लक्ष्मण यांच्या डोक्यात लोखंडी स्टूल मारला आणि त्यानंतर लक्ष्मण हे जागेवर खाली पडले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतर एका व्यक्तीवर देखील ईश्वर याने हल्ला केला त्यामुळे ते देखील जखमी झालेले आहेत .