महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना सोलापूर येथे अंबिकानगर परीसरात उघडकीला आली असून राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर रागाच्या भरात पतीने स्वतःच्या घराला आग लावल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या या प्रकारात घरातील फ्रीज कपाट आणि इतर संसाराचे साहित्य जळून खाक झाले असून सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शामसुंदर अंबाजी भंडारी ( राहणार नक्का वस्ती ) याने रविवारी पत्नीला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते त्यावेळी त्याने घरातील टीव्ही देखील फोडला आणि इतर साहित्याचे देखील नुकसान केले. पत्नी मुलांसोबत घरातून निघून गेल्यानंतर त्याने घर पेटून देईल अशी धमकी दिली होती.
सोमवारी संध्याकाळी तो घरी आला आणि काही वेळाने तो घरातून निघून गेला. थोड्याच वेळात त्याच्या घरातील आग मोठ्या प्रमाणात पेटली आणि आगीने उग्र स्वरूप धारण केले. स्थानिक लोकांनी तात्काळ अग्निशामक दलाला फोन करून ही माहिती कळवली असता अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी घरावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
घरातील इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने आग भडकल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.