महाराष्ट्रात अनेक वेळा आंदोलनकर्त्या व्यक्तींकडून एखाद्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन होत असते असाच एक प्रकार नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. सव्वीस तारखेला यांनी हे आंदोलन केले होते मात्र हे आंदोलन विनापरवानगी केलेले असल्याने आंदोलकांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध खोटे आरोप करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. या मोर्चाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते तर बांगर यांचे विधानसभा सदस्य सदस्य पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द करावे, अशी देखील मागणी केली होती.
सदर आंदोलन हे विनापरवानगी केले असल्याने पवन पवार, महानगरप्रमुख अविनाश शिंदे, वामन दादा गायकवाड, उर्मिला गायकवाड, वंदना काळे, प्रतिभा पानपाटील, सचिन पालवे यांच्यासह 17 मुख्य आंदोलकासह दहा ते पंधरा साथीदारांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित आंदोलकांनी पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत जमावबंदी आदेशाचा भंग केला तसेच कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केले असा पोलिसांनी त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे.