देशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून दलित मुलासोबत प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी चक्क तिचे शुद्धीकरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशात हा प्रकार घडलेला असून मुलीने त्या मुलासोबत लग्न केल्यानंतर वडिलांनी तिचे सर्व केस कापले आणि तिला नर्मदेच्या नदीत डुबकी मारायला सांगितली. वडिलांच्या या अघोरी प्रकारानंतर तरुणीने वडिलाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बैतूलमधील ही घटना असून सदर मुलगी ही नर्सिंगचे शिक्षण घेते. तिचे अमित अहिरराव नावाच्या एका तरुणासोबत सूत जुळले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर पोलिसांच्या मदतीने सासरहून तिला परत बोलवण्यात आले आणि पुन्हा शिकण्यासाठी पाठवण्यात आलं मात्र ती पुन्हा पळून तिच्या नवऱ्याच्या घरी पोहचली. त्यानंतर तरुणीने आरोप केला आहे की, वडिलांनी 18 ऑगस्ट रोजी तिला नर्मदा नदीवर नेत 4 लोकांसमोर अर्धनग्न करून शुद्धीकरण केलं.
मुलीच्या म्हणण्यानुसार ‘ तिला नदीत डुबकी लावण्यास सांगितले आणि त्यानंतर तिला एका पुडीतून काही तरी खाऊ घातलं. तिचे केस कापले आणि शरीरावर घातलेले कपडे तेथेच फेकून दुसरे कपडे देण्यात आले. दलित तरुणासोबत लग्न केल्यामुळे शुद्धीकरण करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं. दलित मुलाला घटस्फोट देऊन दुसऱ्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात आहे ‘ असेही तिचे म्हणणे आहे.