महाराष्ट्रात पोलीस कुठल्या गोष्टीवरून आरोपीपर्यंत पोहोचेल हे कोणीही ठरवू शकत नाही. चित्रपटात जरी पोलिसांची प्रतिमा नकारात्मक रंगवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र पोलीस यांनी अनेक अशक्य गुन्ह्यांचा तपास लावलेला आहे. अशीच एक घटना नागपूर येथे उघडकीला आली असून चोरी करत असताना एका महिलेने स्कार्फ बांधलेला होता त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता मात्र केवळ तिच्या मनगटाला बांधलेला एक धागा आणि आणि तिची चालण्याची पद्धत इतक्याशा पुराव्यावरून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने महिलेचा छडा लावून तिला अटक केली आहे.
प्रिया मानकर ( ब्राह्मणी उमरेड ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. आठवड्याभरापूर्वी प्रीती नंदेश्वर नामक महिला चंद्रपूरला जात असताना प्रवासादरम्यान प्रिया हिने त्यांची पर्स चोरी केली होती. त्या पर्समध्ये 70 हजारांची सोन्याची चैन, चाळीस हजारांची चपला कंठी असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज प्रिया हिने पसार केला होता.
प्रीती यांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रार दिली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना एक महिला चोरी करताना दिसून आली होती मात्र स्कार्प बांधल्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र मानकर यांच्या पथकाने महिलेच्या हातातील धागा, पायातील जोडवे आणि तिची चालण्याची पद्धत इतक्याशा माहितीवरून तिची ओळख पटवून तिला अटक केली आहे तसेच तिच्याकडून चोरलेला एक लाख दहा हजारांचा माल देखील जप्त करण्यात आलेला आहे.