महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून वसुलीच्या जुलमी त्रासामुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात पाढे गावातील एका युवा शेतकऱ्याने बँकेच्या कर्ज वसुलीच्या त्रासाला वैतागून गळफास घेत आत्महत्या केली आहे. संदीप राजेंद्र भुसाळ ( वय चोवीस ) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेतले होते. बँकेकडून सातत्याने कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या शेतालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मयत व्यक्तीं व्यक्तीचे मावस भाऊ यांनी या घटनेबाबत दिंडोरी पोलिसांना खबर दिली असून त्यात म्हटले आहे की, ‘ माझा भाऊ संदीप राजेंद्र भुसाळ हा आई भाऊ आणि आजी यांच्या सोबत राहतो आणि शेती करतो. त्याने बँकेकडून कर्ज घेतले होते मात्र तीन वर्षांपासून कोरोना संकट आणि शेतीतील कमी उत्पन्न यामुळे बँकेचे हप्ते थकले होते’.
आत्महत्या करण्याआधी त्यांनी मोबाईलमध्ये याबाबतचे स्टेटस ठेवले होते. आपण कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, असे त्यांनी म्हटले होते सदर प्रकरणी दिंडोरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ हे करत आहेत.