राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काल ट्विट करत अमृता फडणवीस यांच्याशी ड्रग्ज पेडलरचं कनेक्शन काय ? असा सवाल करत जयदीप राणा आणि अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता. अमृता फडणवीसांचं नाव घेतल्याने मलिक खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना चांगलेच ठणकावले आहे . दरम्यान रिव्हर सॉंग मधील क्रेडिट लिस्ट मधून मलिक यांच्या आरोपानंतर रहस्यमय रित्या जयदीप राणा याचे नाव गायब झाले आहे .
नवाब मलिक काय म्हणाले ?
जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी विचारु इच्छितो, फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय ?. दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का ? भाजप नेत्यांनीही अजित पवार यांच्या बहिणींची नावं घेतली, माझ्या मुलीचं नाव घेतलं . किरीट सोमय्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या आई-बहिणीविषयी उल्लेख केला. किरीट सोमय्या संजय राऊत यांच्या पत्नीविषयी बोलले. एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात जावं लागलं.सोमय्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीविषयी बोलतात. भाजपनं राजकारणाचा स्तर खाली नेलाय . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाहीच, त्यामुळे फडणवीसांनी पुरावे नसताना केलेल्या आरोपामुळे त्यांनी आता माफी मागावी.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती करणारे नवाब मलिक यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ड्रग पेडलर याच्या सोबत अमृता फडणवीस यांचा फोटो प्रसिद्ध केला अन भाजपचे नेते मलिक यांच्यावर तुटून पडले. महिलांवर हल्ला करणाऱ्या मलिकांचा निषेध व्यक्त करताना त्यांनी राजकारणाची पातळी सोडल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. भाजपच्या डझनभर नेत्यांनी अमृता फडणवीस प्रकरणी काल मलिकांवर जोरदार टीका केली. आज त्यांच्या याच टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.