मुलगी झाली तर जाळून मारेन आणि मुलगा झाला तर.., प्रकरण पोलिसात

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीला आली असून ‘ मुलगी झाली तर जाळून मारेन आणि मुलगा झाला तर माहेरी पाठवीन ‘ अशी धमकी देत एका विवाहितेला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. आरोपी हा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने तिला तलाक देण्याची देखील धमकी दिल्याचे विवाहितेने परतवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ‘ विवाहितेने 28 मार्च रोजी तिचा पती आसिफ खान सिकंदर खान व एक महिला ( दोघेही राहणार गटर मल्पुरा परतवाडा ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता अचलपूर येथे एकत्र कुटुंबात नांदत असताना पहिल्या प्रसूतीचा खर्च माहेरकडे असतो असे तिला बजावण्यात आले आणि त्यासाठी तू दहा हजार रुपये घेऊन ये असा देखील तिला तगादा लावण्यात आला. जर तुला आता मुलगी झाली तर जाळून मारीन आणि मुलगा झाला तर माहेरी पाठवीन अशी धमकी देखील देण्यात आली.

त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी महिलेची प्रसूती होऊन तिला मुलगा झाला त्यामुळे तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचा भाऊ अचलपूर येथे आलेला असताना महिलेला भावासमोर शिवीगाळ करण्यात आली तसेच पती आणि एका महिलेने महिलेचा फिर्यादीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला तसेच शिवीगाळ करून तिला तलाक देण्याची धमकी देण्यात आली.

हतबल झालेल्या महिलेने अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानंतर हे प्रकरण समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आले मात्र तिथेदेखील विवाहिता आणि तिचा पती यांच्यामध्ये समेट घडून आली नाही आणि अखेर प्रकरण पुन्हा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. पती आणि संबंधित महिलेच्या विरोधात भादवि कलम 498 504 506 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Spread the love