पोलीस म्हटल्यानंतर सर्व शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारा व्यक्ती असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र पैशासाठी पोलीस देखील आजकाल नीतिमत्ता पाळत नसल्याची एक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली आहे. ‘ तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा आणि त्यांच्या सेवानिवृत्ती मधील पैसे घेऊन ये ‘ असे म्हणत मारहाण करत शारीरिक आणि मानसिक त्रास देत विवाहितेला हाकलून दिले म्हणून पोलीस पती आणि सासुच्या विरोधात सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार बाबासाहेब वाघमारे व सासु हिरकणीबाई बाबासाहेब वाघमारे ( दोघे राहणार नराळे तालुका सांगोला ) अशी आरोपींची नावे आहेत. पत्नी वर्षा राजकुमार वाघमारे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून वर्षा यांचा 10 डिसेंबर 2010 रोजी सोलापूर शहर आयुक्तालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेले राजकुमार बाबासाहेब वाघमारे यांच्याशी विवाह झाला होता.
लग्नानंतर सासरच्या लोकांनी त्यांना सहा महिने व्यवस्थित नांदवले आणि त्यानंतर तुला मूलबाळ होत नाही असे म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात पीडिता यांच्या वडिलांचे निधन झाले आणि सेवानिवृत्तीचे पैसे मिळणार असल्याने त्यातील तुझ्या वाटणीचे पैसे तू घेऊन ये असे म्हणून तिला मारहाण करायला सुरुवात केली. 28 मार्च रोजी घरातून हाकलून देण्यात आले असे देखील पीडितेचे म्हणणे आहे.