गुढीपाडव्याच्या दिवशी बीड जिल्ह्यात शेपवाडी येथील पुरोहित असलेले संतोष दुर्गादास पाठक ( वय 52 राहणार रविवार पेठ अंबाजोगाई ) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणी आरोपी स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात हजर झाला असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . त्याने पाठक यांचा खून का केला ? याचे गूढ अद्यापही कायम आहे.
संतोष पाठक हे शेपवाडी येथे पौरोहित्य करण्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजता ते मारुती मंदिरात असताना पांडुरंग अच्युत शेप ( वय 27 राहणार शेपवाडी ) याने विनाकारण हातातील चाकूने वार करून त्यांचा खून केला होता. महादेव मंदिरात उपस्थित असलेल्या महिलांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने ऐकले नाही. रक्तबंबाळ झालेल्या पाठक यांना अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
महेश दुर्गादास पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पांडुरंग यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग हा आजारी असून त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले असून पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे पाठवण्याचा सल्ला स्थानिक रुग्णालयाने दिलेला आहे मात्र अद्यापही त्याने संतोष पाठक यांचा खून का केला ? हे सत्य समोर आलेले नाही.