नथ पहायला घेतली अन चक्क ‘ इथं ‘ लपवली, महिला सीसीटीव्हीत धरली

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानावर पाळत ठेवून चोरी केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील तळोदा येथे अशीच एक घटना समोर आलेली असून खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलेने दुकानदाराची नजर चुकवत चक्क पाहण्यासाठी म्हणून दिलेली नाकातली सोन्याची नथ ही तोंडात टाकून चोरीचा प्रयत्न केला. तळोदा शहरातील सराफ बाजार येथे हा प्रकार घडला मात्र सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्यानंतर दुकानदाराने पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली आणि महिलेने इमानदारीने ती नथ परत केली आणि तिथून पळ काढला.

तळोदा शहरातील सराफ बाजार येथे दोन ते तीन दिवसांपासून एक महिला दुकानांमध्ये जाऊन दागिन्यांची चौकशी करत खरेदी न करताच परत जात होती. हे परिसरातील दुकानदारांना लक्षात आले. गुरुवारी संध्याकाळी हिच महिला मेन रोड वरील ओम ज्वेलर्स या दुकानात गेली होती. तिथे तिने दुकानदाराकडे नथीची मागणी केली.

दुकानदाराने दागिना आणून दिल्यानंतर तिने हातचलाखी करत एक दागिना उचलून तोंडात टाकला आणि त्यानंतर दागिना पसंत नसल्याचे सांगत महिला परत जायला लागली. ते पाहून दुकानदाराने दागिन्यांचे वजन केले तेव्हा वजन कमी आल्याचे लक्षात आल्यावर त्याने महिलेला थांबून धरले आणि सीसीटीव्ही तपासणी सुरू केली त्यावेळी या महिलेचा कारनामा उघडकीस आला. दुकानदाराने महिलेला पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची धमकी दिल्यानंतर तिने लगेच तोंडात लपवलेली ती नथ परत केली.

त्यानंतर देखील या महिलेच्या वर्तणुकीत काही बदल झाला नाही. तिने पुन्हा मेन रोड वरील दुसऱ्या एका दुकानात तशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न केला त्यावेळी दुकान मालक निलेश सोनार यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर मात्र पोलिस दाखल झाले आणि महिलेला ताब्यात घेत त्यांनी तिची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.


Spread the love