महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. श्वानप्रेमी आणि महापालिका यांच्यातील वादात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. रात्रीच्या वेळी अक्षरश: गाठून ही कुत्री माणसावर हल्ला करतात त्यातून काही जणांचा जीव गेल्याची देखिल उदाहरणे समोर आलेली आहेत.
कोल्हापूर येथे करवीर तालुक्यात निगवे गावात एक वेगळीच घटना समोर आलेली असून भरधाव मोपेडवरून निघालेल्या महिलेच्या साडीचा पदर कुत्र्याने तोंडात धरून ओढल्याने ही महिला मोपेड वरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. कांचन पांडुरंग तेली ( वय 40 राहणार निगवे दुमाला तालुका करवीर ) असे जखमी महिलेचे नाव असल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन कृष्णात तेली यांच्या मोपेडवर पाठीमागे बसून कांचन तेली या भरधाव वेगाने नदी रोड मार्गे शेताकडे जात असताना गणेश पाटील यांच्या पत्र्याच्या शेडमधून मोपेडच्या पाठीमागून एका कुत्र्याने पाठलाग सुरू केला. त्यावेळी कुत्र्याने मोपेड वरील पाठीमागे बसलेल्या कांचन तेले यांच्या साडीचा पदर तोंडात पकडून ओढला.
गाडीचा वेग जोरात असल्याने कांचन मोपेडवरून रस्त्यावर खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेले आहे. सदर अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.