पुणे जिल्ह्यात आळंदी येथे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वडमुखवाडी चरोली येथे डुक्कर बॉम्बचा स्फोट होऊन एका पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता त्यानंतर देखील त्याच मुलीच्या आईला परिसरात तशाच स्वरूपाचे बॉम्ब दिसून आले म्हणून त्यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्या वेळी परिसरात आणखी बारा डुक्कर बॉम्ब आढळून आलेले आहेत. सदर प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुपारी एवढ्या आकाराचा दोरा गुंडाळलेला एक गोलाकार पदार्थ वडमुख वाडी येथील राहणाऱ्या नानाश्री हॉटेलमागे पाच फेब्रुवारी २०२२ रोजी एका मुलीला आढळून आला होता आणि तिने तो पाहिला असता त्याचा स्फोट झाला. त्यात राधा गोकुळ गवळी या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला होता तर इतरही दोन मुले जखमी झाली होती. हा प्रकार सदर घटनास्थळापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका झोपडीतील दोन तरुणांनी केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटकही केली होती आणि त्यानंतर तेथील झोपड्यादेखील उठवण्यात आलेल्या होत्या.
सदर घटना घडून गेल्यावर शुक्रवारी सकाळी मयत राधा यांच्या आईला त्याच परिसरात आणखी दोन डुक्कर बॉम्ब आढळून आले आणि त्यांनी आणि त्यांच्या पतीने यासंदर्भात पोलिसात खबर दिली. पुण्यातील बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असता तिथे तब्बल बारा डुक्कर बॉम्ब आढळून आले. सदर बॉम्ब याआधी झालेला स्फोट याच वेळचे असावेत अशी शक्यता दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे यांनी व्यक्त केली आहे.