महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीला आली असून अवघ्या दोन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या साठ वर्षे वयाच्या इसमाच्या विरोधात पाचोरा पोलिसात बुधवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला घराबाहेर खेचत जबरदस्त मारहाण केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील दोन वर्षाच्या पीडित मुलीच्या आईने याप्रसंगी तक्रार दिली असून 12 तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांची दोन वर्षाची मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी शोधाशोध केली असता शेजारी राहणारा इसम सुभाष महादू महाजन ( वय 60 ) या इसमाच्या घरातून रडण्याचा आवाज आला त्यावेळी त्यांनी दरवाजा ठोठावला असता दरवाजा आतून बंद होता त्यानंतर महिलेने आरडाओरडा करत तिच्या गल्लीतील लोकांना बोलावले
घराबाहेर मोठा जनसमुदाय जमला आणि आणि त्यानंतर सुभाष महाजन हा बालिकेशी अश्लील चाळे करताना आढळून आला त्यामुळे गल्लीतील लोकांनी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले आणि त्याची जबरदस्त धुलाई केली. त्यानंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सदर मुलीची सुटका करून पोलिसांना या प्रकरणी खबर देण्यात आली
पाचोरा पोलिसात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून सुभाष महाजन राहणार ( नगरदेवळा ) याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करत आहेत.