महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील गोंदूर शिवारात उघडकीला आली असून शेत जमीन नावावर करून देण्याच्या कारणावरून आशाबाई पाटील या गर्भवती महिलेवर विषप्रयोग केल्याची बातमी समोर आलेली आहे. शनिवारी संध्याकाळी देवपुर येथील आधारनगर येथे हा प्रकार घडलेला असून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
सदर प्रकरणी, आशाबाई बाळासाहेब पाटील या पंचवीस वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मधुकर फुला पाटील, नलिनीबाई मधुकर पाटील देवदत्त मधुकर पाटील, शिवदत्त मधुकर पाटील ( सर्वजण राहणार मयूर शाळेजवळ वाडीभोकर रोड देवपूर ) यांच्या विरोधात रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आशाबाई पाटील यांच्या घरी हे चार जण गेले होते त्यावेळी त्यांनी तिच्या सोबत वाद घालत तिला शिवीगाळ करत कुठलेतरी विषारी द्रव्य तिला पाजले. आशाबाई ही गर्भवती असल्याची माहिती असताना सुद्धा तिला जिवे मारण्याचा हा प्रकार करण्यात आला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि प्राथमिक उपचारानंतर आशाबाई हिने पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठत रविवारी संध्याकाळी तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक एम एच सय्यद सदर प्रकरणी तपास करत आहे