महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मॅरेज रॅकेट नावाचा एक वेगळाच गुन्हेगारीचा पॅटर्न रुजू होत आहे. कमिशनपोटी मधल्या दलालांनी अक्षरशः लग्न झालेल्या महिलांची देखील लग्ने दुसऱ्यांदा लावलेली आहेत. लग्न केल्यानंतर नवीन घरी गेल्यावर दोन दिवस राहायचे आणि दागिने घेऊन पलायन करायचे असे प्रकार सुरू असल्याने विवाहेच्छुक तरुणांमध्ये देखील नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यात उघडकीला आली आहे.
पहिले लग्न झालेले असताना महिलेने घटस्फोटित असल्याचे भासवून एका व्यक्तीसोबत लग्न केले आणि त्याच्याकडील दोन लाख रुपये आणि पन्नास हजार रुपयांच्या संसार उपयोगाच्या वस्तू घेऊन पलायन केले. तळोदा येथे ही घटना घडली असून पीडित व्यक्तीने पोलिसात धाव घेतलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तळोदा येथे जोशीनगर भागात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेचे पहिले लग्न झालेले होते मात्र आपण घटस्पोटीत असल्याचे सांगत तिने मोबीन लुकमान मनियार ( राहणार विक्रम नगर तालुका तळोदा ) याच्या सोबत लग्न केले आणि लग्नातून दोन लाख रुपये आणि पन्नास हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू घेऊन ती निघून गेली.
न्यायालयात लग्न झाले नसल्याचे आणि तिची फसवणूक करत धर्मपरिवर्तन केले असल्याची खोटी तक्रार तिने दिली आणि आपल्या परिवाराची बदनामी केली असे फिर्यादी यांनी म्हटले आहे. मोबीन मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या महिलेच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार हे करत आहेत