गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून पुण्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना समोर आलेली असून मैत्रीचे संबंध निर्माण करून तरुणीला प्लॉट दाखवायला म्हणून घेऊन गेल्यावर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्याचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देखील देण्यात आली. पीडितेच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2021 पासून एप्रिल 2022 पर्यंत हा प्रकार तिच्यासोबत निगडीतील थरमॅक्स चौक परिसरात घडत होता.
पीडित तरुणीने शनिवारी देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रवीण धोंडीबा गुंजवटे त्याचा भाऊ राहुल गुंजवटे बहिण आणि आई ( सर्वजण राहणार देहूगाव तालुका हवेली ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी प्रवीण याने फिर्यादी तरुणीला प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून नेले आणि कोणाच्या तरी घरी नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली त्यावेळी त्याचा व्हिडिओ देखील आरोपीने बनवला आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवत त्याने फिर्यादी तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले.
आरोपी प्रवीण याने फिर्यादी तरुणीला तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले मात्र अचानकपणे त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचे ठरवले. फिर्यादी तरुणीला हा प्रकार समजताच तिने त्याचे घर गाठले आणि विचारणा केली असता प्रवीणचा भाऊ बहीण आणि आई यांनी फिर्यादी तरुणीला मारहाण करून घराबाहेर काढले. ‘ तुला जे काय करायचे ते तू कर मात्र पुन्हा आमच्या दारात यायचे नाही ‘ असे म्हणत त्यांनी तरुणीला हाकलून दिले म्हणून तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.