महाराष्ट्रात पुणे इथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलिसाच्याच जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या एका धक्कादायक खुलाशामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. आपला आधीचा बॉयफ्रेंड असलेल्या सहकाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या महिला कॉन्स्टेबलने हा धक्कादायक खुलासा केला आहे. शीतल पानसरे (वय २९ ) असे या महिला आरोपीचे नाव असून शीतल ही एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचीही हत्या करण्याची योजना आखत होती असे समोर आले असून तिला या कामात चक्क एक पोलीस उपनिरीक्षक मदत करत असल्याचा देखील खुलासा झाला असून संबंधित आरोपी पोलीस उपनिरीक्षक मात्र सध्या फरार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नवी मुंबईतील नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी सानप यांचा ऑगस्ट महिन्यात हिट अँड रनमध्ये मृत्यू झाला. घरी जात असताना शिवाजी सानप यांना नॅनो कारने धडक दिली होती. शिवाजी सानपच्या मृत्यूला जबाबदार ड्रायव्हरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शीतल पानसरे ही महिला पोलीस कर्मचारीच या मागची सूत्रधार असल्याचे समोर आले, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तिला अटक करण्यात आली होती.
आरोपी शीतल पानसरे आणि मयत शिवाजी सानप हे यापूर्वी रिलेशनशीपमध्ये होते मात्र त्यांच्यात काही कारणांनी वितुष्ट आले आणि त्यानंतर हा प्रकार झाला. शीतल पानसरेला मदत केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आणखी दोघा जणांना अटक केली आणि पोलीस स्टेशनमधील पीएसआयही या कटात सामील असल्याचं तपासात उघडकीस आलं मात्र तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी परागंदा झाला होता.
पोलिसांनी शीतल पानसरे हिची कसून चौकशी सुरु केली असून शीतल हिने एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हत्येचाही प्लॅन आखला होता. “आम्ही तिच्याशी बोलून हत्येच्या कटाचं कारण जाणून घेतलं आहे. आरोपींना शिवाजी सानपप्रमाणेच संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचाही रस्ता अपघातात मृत्यू घडवून आणायचा होता ” अशी माहिती नवी मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली मात्र सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव पोलिसांनी त्याचं नाव गुप्त राखलं आहे.