संसार म्हटलं की वाद-विवाद आलेच मात्र नवरा बायकोच्या भांडणात मध्ये पडणे एका पोलिसाला चांगलेच अंगलट आले असून नाशिक येथील या घटनेत पोलिसाला देखील लाकडी दंडुक्याने मार खावा लागलेला आहे.. नवरा बायकोचे जोरदार भांडण सुरू असून नवरा बायकोला मारहाण करत असल्याचा एक फोन 112 नंबरवर एका नागरिकाने केला होता त्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहोचले असता संशयित व्यक्तीला पोलिसांनी घराबाहेर बोलून माहिती विचारण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने जवळ पडलेला लाडका दंडुका हातात घेत पोलिसांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील नोंदवही घेऊन पलायन केले. 24 तारखेला मध्यरात्री ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, वडाळा नाका परिसरातील रेणुका नगर भागात एका दाम्पत्यामध्ये रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार भांडण सुरू होते. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यातील एका जागरूक नागरिकांने सदर प्रकरणातील संशयित असलेला हल्लेखोर पती विकास मुकेश लाखे याच्याबद्दल तक्रार केली त्यानंतर काही मिनिटांतच मुंबई नाका पोलिस ठाण्याचे हवालदार मदन यशवंत बेंडकुळे ( वय पंचेचाळीस) हे त्यांच्यासोबत पोलीस शिपाई नवनाथ उगले यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी आल्यानंतर लाखे यांना त्यांनी घराच्या बाहेर बोलावले आणि चौकशीला सुरुवात केली असता लाखे याने तिथे पडलेला लाकडी दंडुका उचलून पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडील नोंदवही हिसकावून घेत शासकीय कामात देखील अडथळा आणला. हे केल्यानंतर तो रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. बेंडकुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित असलेला लाखे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.