महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून शहरातील बार्शी शहरातील गाडेगाव रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृहाजवळ बसून गांजा विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून नऊ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अल्ताफ मैनुद्दिन पठाण ( वय 32 राहणार नागणे प्लॉट बार्शी ) असे आरोपीचे नाव असून अल्ताफ पठाण हा युवक गांजा बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना मिळाली होती.
रामदास शेळके यांनी तात्काळ पोलीस पथकाला बोलावून गाडेकर रोडवरील त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यास सांगितले त्यावेळी एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याची पिशवी तपासताच त्यात एक किलो 374 ग्रॅम गांजा आणि सुमारे तीन हजार रुपये आढळून आले. त्याच्याकडील गांजा आणि पैसे जप्त करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे