देशात अनेक ठिकाणी ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून कर्ज प्रकरणात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांचे शोषण होत असून अशीच एक घटना अमरावती येथे समोर आलेली आहे. आठवड्यासाठी घेतलेले ऑनलाइन कर्ज विहित मुदतीत न भरल्याने एका महिलेच्या छायाचित्रांचे मॉर्फिग करून तिची छायाचित्रे तिच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवण्याचा धक्कादायक प्रकार वरुड येथे उघडकीस आला आहे. 13 ते 30 एप्रिल दरम्यान हा प्रकार घडलेला असून वरुड पोलिसांनी 38 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार रिंग रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने सात एप्रिल रोजी प्ले स्टोअर वरून कॅश ऍडव्हान्स पॉकेट नावाचे एक ॲप डाऊनलोड केले होते आणि यावरून सात दिवसांच्या मुदतीवर 3560 रुपयांचे कर्ज घेतले होते.
कर्जाने घेतलेली रक्कम एक आठवड्याच्या आत ही भरू शकली नाही म्हणून 13 एप्रिल रोजी तिला एक मोबाईल कॉल आला आणि महिलेने त्यावर समोरील व्यक्तीने पाठवलेल्या लिंक वर क्लिक करत 3796 रुपये भरले मात्र तरीदेखील तिला वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल करून पैसे भरले नाहीत म्हणुन त्रास देण्यास सुरुवात झाली.
ऑनलाइन कर्ज देताना ॲपच्या माध्यमातून संशयितांनी महिलेच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ॲक्सेस मिळवला होता आणि त्यातून तिच्या संपर्कातील सर्व लोकांना या व्यक्तीने महिलेची मॉर्फ केलेली छायाचित्रे पाठवली . यासंदर्भात एका परिचिताने माहिती दिल्यावर तिला धक्काच बसला. वेळोवेळी करत महिलेने तब्बल दहा हजार रुपये भरल्यानंतर देखील तिला हा त्रास सुरू होता. त्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. याआधी देखील असेच प्रकार उघडकीला आलेले असून ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्ट मिळवली जाते आणि त्यातून असे प्रकार केले जातात. नागरिकांनी अशा प्रकारच्या विरोधात पुढे येणे गरजेचे आहे.