महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना मुंबई येथे समोर आलेली आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसताना देखील कर्जाच्या परतफेडीसाठी सतत फोन करत असल्यामुळे वैतागून आणि या प्रकारातून झालेल्या बदनामीमुळे एका तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे. कुरार परिसरात ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, संदीप कोरेगावकर ( वय 38 ) असे मयत तरुणाचे नाव असून तो कुरार येथे पत्नी आई वडील आणि भावाच्या सोबत राहत होता. तो एका खासगी कंपनीत कामाला असून 23 एप्रिल रोजी संदीपच्या आलेल्या फोनने सर्वांनाच धक्का बसला. कुटुंबीयांनी म्हटल्याप्रमाणे त्याने कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नव्हते तरीदेखील त्याला आणि त्याच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना अश्लील संदेश पाठवत तसेच त्याच्या कर्जाबाबत त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली होती . सतत विचारणा होत असल्याने तो मानसिक दबावाखाली गेलेला होता.
27 एप्रिल रोजी पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार देखील देण्यात आलेली होती. हॅलो कॅश नावाच्या एका ऍप माध्यमातून संदीप याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओज संदेश व्हायरल केले जात होते. संदीपच्या कुटुंबीयांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी कुठलेही कर्ज घेतलेले नव्हते तरीदेखील त्याला देण्यात येत असणारा हा त्रास थांबला नाही आणि अखेर 4 मे रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
राज्यात सध्या ऑनलाइन कर्ज प्रकाराने धुमाकूळ घातलेला असून ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यातून आपले कॉन्टॅक्ट, फोटो गॅलरी यांच्यासह इतरही सोशल मीडिया अकाउंटचा ॲक्सेस पूर्णपणे मिळवला जातो आणि त्यातून कर्ज घेणारा व्यक्ती आणि त्याच्या संपर्कातील व्यक्ती यांचे भ्रमणध्वनी देखील मिळवले जातात आणि पैसे दिले नाहीत तर या लोकांना फोन करून अथवा व्हाट्सअपवर समोरील ज्याने कर्ज घेतले आहे अशा व्यक्तीचे मॉर्फ केलेले अश्लील स्वरूपाचे फोटो बनवून व्हाट्सअप वर टाकले जातात आणि त्यामुळे बदनामी होते तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना फोन करून ‘ अमुक व्यक्तीने आमचे कर्ज बुडवले आहे. तुम्ही त्याच्या ओळखीत असाल तर त्याला सांगा असे सांगून देखील व्यक्तीची बदनामी करण्यात येते’. कुठल्याही कागदपत्रांशिवाय त्वरित मिळणाऱ्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गाढवे यांनी केले आहे.