देशात सध्या राजकीय वातावरण धार्मिक आधारावर काही प्रमाणात तापलेले असून अशा परिस्थितीत देखील काही विकृत लोक आपल्या मानसिकतेचे प्रदर्शन घडवत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आलेली असून अल्पसंख्यांक समाजाच्या संदर्भाने आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमात व्हायरल करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अव्वल कारकूनाला जिल्हाधिकारी यांनी डायरेक्ट निलंबित केलेले आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेला लिपिक बबनराव मिरगे याने अल्पसंख्यांक समाजाविषयी समाज माध्यमात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. सरकारी काम करणाऱ्या व्यक्तीकडून अशा स्वरूपाची पोस्ट टाकण्यात आल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आल्यावर अल्पसंख्यांक समाजात रोष निर्माण झाला आणि त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात देखील अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली त्यानंतर सहा मे रोजी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी त्याला निलंबित केलेले आहे. आरोपीला बुलढाणा न्यायालयात हजर केले असता नऊ मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.