पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून ‘ आम्ही इथले भाई आहोत. आम्हाला कुणी हप्ता दिला नाही तर आम्ही त्यांना कापून टाकू ‘ अशी धमकी देत एका व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या गल्ल्यातून 2200 रुपये नेण्यात आले . पिंपरी येथील ही घटना असून सदर प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. थेरगाव येथील जगताप नगर परिसरात संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दुर्गाराम वेनाराम मेघवाल ( वय 37 राहणार जगताप नगर थेरगाव मूळ राहणार राजस्थान ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून सौरभ चौधरी ( वय 20 राहणार जगताप नगर थेरगाव ), स्वप्निल संजय येडते ( वय 20 राहणार रहाटणी ) , आतिश शिरसाट, अमोल खंडागळे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौधरी आणि येडते यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून आरोपी हे फिर्यादी यांच्या पोंगा बनवण्याचा कारखान्यात आरडाओरडा करत आले आणि तू आम्हाला ओळखत नाही का ? आम्ही एरियाचे भाई आहोत. दर महिन्याला आम्हाला दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे म्हणाले. फिर्यादी यांनी मी गरीब आहे हे मला शक्य होणार नाही असे म्हटल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या गल्ल्यातून 2200 रुपये काढून पलायन केले त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात दाखल होत तक्रार नोंदवली.