गेल्या काही वर्षांपासून पुणे येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उघडकीला आली असून वडगाव मावळ येथे एका युवकाची सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास लोखंडी कोयता आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आलेली आहे. विश्वजीत राजेंद्र देशमुख ( वय 22 राहणार संस्कृती सोसायटी वडगाव तालुका मावळ ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
वडगाव हद्दीत एका हॉस्पिटलजवळ बस स्टॉपच्या समोर पूर्वी झालेल्या भांडणातून मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून येत लोखंडी कोयते आणि तलवारीने विश्वजित देशमुख यांच्यावर वार केले. डोक्यात पाठीवर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या महेश गायकवाड व अभिषेक ढोरे यांच्यावर देखील आरोपींनी वार केल्याने ते देखील जखमी झाले आहेत .
सदर प्रकरणी महेश काशिनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली असून घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दीपेश गट्टे, पोलीस उपाधीक्षक भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन सहकाऱ्यांच्या मदतीने पंचनामा केला. वडगाव परिसरात पोलिसांचा वचक नसल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी भाड्याने घर घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.