राज्यातील राजकीय घमासनात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधणारे हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी याआधी बंडखोर शिवसेना आमदारांच्या मुलांना मुली मिळणार नाहीत असे वक्तव्य केले होते मात्र त्यानंतर अचानकपणे त्यांनी भूमिका बदलत विश्वास दर्शक ठराव दरम्यान शिंदे गटाच्या बाजूने मत दिल्यामुळे हिंगोली ग्रामस्थांना देखील नवल झालेले आहे.
आतापर्यंतच्या घडामोडीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने संतोष बांगर हे उभे होते. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बाजूने आपले मत व्यक्त करण्यासाठी त्यांनी एकही संधी सोडली नाही आणि त्याबद्दल त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कौतुक देखील मोठ्या प्रमाणात झाले होते. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी चक्क अश्रू ढाळत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे असे म्हटले होते त्यानंतर अखेरपर्यंत आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहू असे देखील त्यांनी अनेकदा सांगितले.
चार जुलै रोजी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार बद्दल विश्वासदर्शक ठराव सुरू असताना त्यांनी मात्र चक्क एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हात उंचावल्याचे समोर आले आणि त्यानंतर हिंगोलीत या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली. बंडखोरांच्या मुलांना मुली मिळणार नाही, असे वक्तव्य केल्याने केल्यानंतर अचानकपणे बांगर यांच्या भूमिकेला घडलेला बदल यामागे कारण काय ? याबद्दल नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आलेले आहे.