काही दिवसांपूर्वी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानाच्या वॉल कंपाऊंडवर आक्षेपार्ह मजकूर केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळख असणारे डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने पोलिसांनी देखील या प्रकरणाचा सखोल तपास करत परिसरातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर सुरेश पाटील असे त्याचे नाव असल्याचे समजते. त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्ञानेश्वर याचा म्युझिक सिस्टीम अर्थात डीजेचा बिजनेस असून याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या भुसावळ येथील काही जणांसोबत त्याचा वाद झाला होता मात्र त्याचा राग त्याने पोलीस अधीक्षक यांच्या भिंतीवर काढत वेगवेगळ्या स्वरूपाची चित्रे काढलेली होती तसेच काही मजकूर देखील लिहिलेला होता.
19 जून रोजी हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पूर्ण शहरात या प्रकाराची जोरदार चर्चा होती . पोलीस तपासात ज्ञानेश्वर यांनी हा प्रकार केल्याचे उघडकीला आल्यानंतर भुसावळ येथील काही जणांनी आपल्या विरोधात मोहीम उघडली होती म्हणून आपण हे काम केले असे म्हटले आहे मात्र पोलीस अधीक्षक यांच्यासोबत आपला कुठलाही वैयक्तिक वाद नाही आणि त्याची इतकी चर्चा होईल याची आपल्याला कल्पना देखील नव्हती असे म्हटले आहे. ज्ञानेश्वर हा साधारण कुटुंबातील असून पोलिसांनी त्याला नोटीस देऊन त्याची सुटका केलेली आहे.