सतत प्रपोज करून देखील तरुणी गांभीर्याने घेत नसल्याने ‘ आता जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन ‘ असा संदेश पाठवून एका तरुणीला मानसिक त्रास देण्याचा प्रकार औरंगाबाद येथील सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला आहे. सदर मेसेज आल्यानंतर सिडको पोलिसांनी तरुणाच्या विरोधात विनयभंग यासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चैतन्य राजेंद्रबाबू ढोके ( वय 34 राहणार सिडको ) असे संशयिताचे नाव असून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तो या तरुणीला मला तू आवडतेस असे म्हणत प्रपोज करत होता. सदर तरुणीची आणि चैतन्य याची पहिल्यापासून ओळख असून यातूनच त्याने तिला प्रपोज केले होते मात्र तरुणीने त्याला नकार दिल्यानंतरही तो तिचा पाठलाग करत होता. अनेकदा त्याने तिला रस्त्यात देखील आडून प्रपोज केल्याचे तरुणीचे म्हणणे आहे.
परिचय असल्यामुळे तरुणीचा मोबाईल नंबर त्याच्याकडे होता त्यामुळे त्याने या मोबाईलवर तिला फोन करून वारंवार प्रपोज केले आणि मेसेज करून त्रास दिला मात्र ती प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने ‘ माझ्याशी जर तू आता यापुढे बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन ‘ अशी धमकी दिली त्यानंतर पीडित तरुणी ही घाबरून गेली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे.