महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना नांदेड इथे उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अर्धापूर शहरात लहुजी नगर येथे राहणारे माजी सैनिक नारायणराव साबळे यांना जन्मदात्या मुलाने चक्क दगडाने मारहाण केली अन त्यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नारायणराव साबळे यांनी 1965 ते 1971 या काळात झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला होता आणि त्यात त्यांच्या मांडीला गोळी लागली होती त्यामुळे त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आले होते.
उपलब्ध माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात लहुजी नगर येथे सेवानिवृत्त माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे राहत होते. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मुलगा विजय साबळे (वय 45 वर्ष) याने वडिलांना मारहाण केल्याचे पाहून चक्क सुनेने आणि विजय याचा 18 वर्षांचा मुलगा शुभम विजय साबळे यांनी देखील त्याला मारहाण करण्यात मदत केली. या मारहाणीत दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले असताना धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि पत्नी गयाबाई यांनी अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी मुलगा विजय नारायणराव साबळे, शुभम विजय साबळे आणि विजय साबळे याची पत्नी या तिघा जणांच्या विरूद्ध कलम 302, 323, 504, 506, 34 भादंवि प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.