नगर जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आलेली असून पोलीस दलातील नियमबाह्य पद्धतीच्या कामाचा यामुळे पर्दाफाश झालेला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नसताना देखील दोन तरुणांना ताब्यात घेऊन बेकायदेशीरपणे पोलीस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचले . सदर प्रकरणी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथील अधिकाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र विभागीय स्तरावरील पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर घटनेमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी ‘ त्या दोन जणांना पकडून आणा आणि ठोकून काढा ‘ असे आदेश दिले होते तसेच ‘ मी येईपर्यंत त्यांना सोडू नका मला देखील त्यांच्यावर हात साफ करायचा आहे ‘, असेही म्हटले होते. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यानंतर पोलिस ठाण्यावर मोर्चा देखील नागरिकांनी काढला होता.
सदर प्रकारातील एक मुलगा हा अल्पवयीन असून बेकायदेशीरपणे मारहाण केली म्हणून या तरुणांनी एडवोकेट सुवर्णा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पोलिसांच्या या बेकायदेशीर मारहाणीनंतर दोन जणांना तीन दिवस रुग्णालयात देखील ठेवावे लागले होते त्यानंतर संबंधित घटनेप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे.