गुजरात मॉडेल हा शब्द अनेकदा प्रगतीचे लक्षण म्हणून नागरिकांना ऐकवला जात असला तरी प्रत्यक्षातील गुजरात मॉडेल हे फसवेगिरी आणि बनावटगिरीचे असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. अशीच एक घटना गुजरातच्या मेहसाना येथे उघडकीला आली असून लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या सामन्यावर सट्टेबाजीच्याही पुढे जात चक्क बनावट आयपीएल अशा प्रकारचा उगम गुजरात येथून झालेला आहे. मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यात हा प्रकार समोर आलेला असून या बनावट सट्टेबाजांनी चक्क डुप्लिकेट आयपीएल सुरू केली आणि त्यासाठी रशियन सट्टेबाजांना आपल्या जाळ्यात ओढले.
धक्कादायक बाब म्हणजे क्रिकेटचे प्रसिद्ध समालोचक असलेले हर्षा भोगले यांचा डुप्लिकेट आवाज काढणारा व्यक्ती देखील त्यांनी शोधला आणि त्यातून आपल्या या डुप्लिकेट आयपीएलची विश्वासार्हता वाढवली. गुजरातमधील या गावात बनावट आयपीएलचे आयोजन केले होते त्यामध्ये चक्क बनावट चेन्नई सुपर किंग्स, बनावट मुंबई इंडियन्स, बनावट गुजरात टायटन यासह सर्वच संघ बनावट बनवले गेले होते.
आयपीएल जिथे बनावट होती तिथे खेळाडू तरी कसे ओरिजनल राहतील त्यामुळे खेळाडूंची नावे देखील लोकप्रिय खेळाडूंच्या नावाशी जुळवणारी देण्यात आली आणि या बनावट आयपीएलचे युट्युबवर ओरिजनल आयपीएल म्हणून प्रक्षेपण देखील केले जात होते. रशियातील तीन शहरातील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांनी ही बनावट आयपीएल उभी केली होती. परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना त्यांनी आपल्या या डुप्लिकेट आयपीएलच्या जर्सी देखील दिलेल्या होत्या. क्रीडा क्षेत्रात असल्या बनावटगिरीचा उगम हा गुजरात इथे झालेला असून क्रीडा क्षेत्रात यामुळे खळबळ उडालेली आहे.