मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून ही कारवाई करण्यात आलेली असून बंडखोर आमदारांवर टीका केल्याने चर्चेच्या झोतात आलेल्या शीतल म्हात्रे यांचा संजय राऊत यांनी अग्नीकन्या म्हणून उल्लेख केला होता मात्र त्यानंतर त्या शिंदे गटात गेल्या आणि त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
ठाणे कल्याण नवी मुंबई डोंबिवली या परिसरातून अनेक नगरसेवक शिंदे गटात दाखल झालेले आहेत मात्र मुंबईतून हे धाडस कोणी दाखवले नव्हते. दहिसर येथील माजी नगरसेविका असलेल्या शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचे वारसदार आहेत असा युक्तिवाद करत अचानकपणे भूमिकेत बदल करत शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे.
शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी बोलताना शिवसेनेत आपली गळचेपी होत होती म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे असे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा मी सुद्धा सर्वसामान्य शिवसैनिक जसा करतो तशाच पद्धतीने वागले. आम्हालाही वाईट वाटले म्हणून मी देखील शिंदे गटावर टीका केली मात्र जेव्हा मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले तेव्हा त्यांनी मांडलेली भूमिका ऐकली त्यावेळी आमचे देखील हेच दुखणे आहे असे मला वाटले आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला असे म्हटले आहे.