राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक खळबळजनक विधान केले असून या विधानावरून राज्यात मोठ्या प्रमाणात रणकंदन होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी ‘ शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि त्यांच्या लिखाणात एवढा अन्याय केला आहे तेवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणीही केलेला नाही ‘ असे म्हटले आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदान आत जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादाजी कोंडदेव यांचे योगदान काय आहे ? असा देखील त्यांनी प्रश्न विचारलेला आहे.
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे पार पडले त्यावेळी ते बोलत होते. पवार यावेळी म्हणाले की, ‘ महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता कुळवाडीभूषण असा केलेला आहे मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास समाजात पसरवला. त्यांनी जे काही लिखाण केले आहे जी काही मांडणी केलेली आहे, ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे अशा व्यक्तीला कधीही मान्य होणार नाही. काही व्यक्तींचे महत्त्व वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे
आज शिवछत्रपतींवर जे लिखाण केले गेले त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार आहे तर काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे तर काही ठिकाणी खोटेही सांगितलेले आहे या पार्श्वभूमीवर श्रीमंत कोकाटे यांनी सत्याच्या आधारावर हे पुस्तक लिहिले असून शिवछत्रपतीविषयी धर्मांध विचार मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. तो कसा चुकीचा आहे हे श्रीमंत कोकाटे यांनी उदाहरणासहित पुस्तकात मांडलेले आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, इतिहास अभ्यासक राजकुमार घोगरे, श्रद्धा कुंभोजकर यादेखील उपस्थित होत्या.