महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नागपूर येथे समोर आलेली असून शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ग्रामीण पोलीस मुख्यालयात चक्क सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कपिल नगर पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शशिकुमार शेंडे ( वय पंचेचाळीस राहणार गोधनी ) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. शुक्रवारी रात्री शशिकुमार यांनी त्यांच्या पत्नीशी फोनवर संवाद करत आपण बाहेर जेवण करणार आहोत असे सांगितले होते त्यानंतर काही वेळाने त्यांच्या पत्नीने फोनवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. शनिवारी दुपारी शशिकुमार यांची गाडी सभागृहासमोर उभी असल्याचे दिसले त्यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
तेथील कर्मचाऱ्यांनी त्यानंतर सभागृहात जाऊन पाहिले असता शशिकुमार यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. कपिल नगर पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पुढे पाठवून दिला.
शशिकुमार शेंडे यांना काही दिवसांपूर्वी कॅन्सर झाला असल्याचे निदान झाले होते त्यामुळे ते नैराश्यात गेले होते आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र त्याआधीच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.